शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!
schedule03 Jun 25 person by visibility 1064 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण केवळ नावापुरतेच ऑनलाइन उरले आहे. कारण दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ऑनलाइन प्रशिक्षण व चाचणी झालीच नाही. या प्रशिक्षणा दरम्यान प्रत्येक तासिकेनंतर दहा गुणांची ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात येणार होती. पण गेले दोन दिवस सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणीमुळे ह्या चाचण्या होऊ शकल्या नाहीत. दुसरीकडे बुधवार ४ जूनपासून चाचण्या सुरळीत होतील असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत सांगण्यात येत आहे.
सलग सेवेची बारा व २४ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांसाठी दहा दिवसांचे दोन जूनपासून ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. मात्र प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच ऑनलाइन प्रशिक्षणाला समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाईन चाचणी लिंक ओपन न होणे, रेंज नसणे, सर्व्हर डाऊन होणे, चुकीचा मोबाईल क्रमांक दाखवणे यामुळे सहभागी शिक्षक त्रस्त बनले आहेत. शिवाय निवड चाचण्या होऊ शकल्या नाहीत. जर या चाचण्या उद्या झाल्या नाहीत तर प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या तीस पेक्षा अधिक चाचण्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी सोडवाव्या लागतील. या चाचणीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
…………..
प्रशिक्षणाची वेळ ही गैरसोयीची…
प्रशिक्षणचा कालावधी हा रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० अशी आहे. दूरवरुन येणाऱ्या शिक्षकांसाठी ही वेळ गैरसोयीची आहे. सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत प्रशिक्षण घ्यावे अशी शिक्षकांनी मागणी केली आहे. शिवाय पूर्वीप्रमाणेच हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले असते तर शिक्षकांना इतका त्रास सहन करावा लागला नसता. अशा शिक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत.
……………..
ऑनलाइन प्रशिक्षणाचा अट्टाहास कोणाच्या फायद्यासाठी
सलग दुसऱ्या दिवशी ऑनलाइन प्रशिक्षणाचा बोजवार उडाल्यामुळे शिक्षक म्हणतात की ऑनलाइन प्रशिक्षणाचा अट्टाहास नेमक्या कोणाच्या फायद्यासाठी आहे. यामध्ये कोणती खासगी कंपनी स्वार्थ साधत आहे. लिंक ओपन होत नाहीत, प्रशिक्षण कालावधीत चहापाण्याची व्यवस्था नाही. ऑनलाइन प्रशिक्षण नाही मग दोन हजार रुपये शुल्क का भरुन घेतले असा सवाल शिक्षक करत आहेत.