देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !
schedule03 Jun 25 person by visibility 2634 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या संशोधन मंचाने २०२४ ची विविध विषयांतील जागतिक आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये डॉ. पाटील मटेरियल सायन्समधील संशोधनात देशात नवव्या स्थानी आहेत.
मटेरियल सायन्समधील संशोधनाच्या अनुषंगाने प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचे विविध संशोधकीय निर्देशांक हे खूप उच्च दर्जाचे आहेत. त्यांच्या संशोधनाचा एच-इंडेक्स ९४, आय-१० इंडेक्स ५४० तर डी-इंडेक्स ८८ इतका आहे. त्यांचे ६०० हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून प्रसिद्ध झाले असून त्यांच्या संशोधनास ३३,८८० सायटेशन्स मिळाली आहेत. अर्थात तितक्या संशोधकांनी डॉ. पाटील यांच्या शोधनिबंधांचे संदर्भ आपल्या संशोधनात दिले आहेत. रिसर्च डॉट कॉमने २०२४मध्ये विषयनिहाय जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये डॉ. पाटील यांना मटेरियल सायन्समध्ये देशातील पहिल्या १० संशोधकांमध्ये आणि जागतिक स्तरावर १५१२ वे स्थान प्राप्त झाले आहे. पाटील हे शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक असून त्यांनी मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून उत्कृष्ट अध्यापन व संशोधन करीत आहेत.
प्रकुलगुरू पाटील म्हणाले, ‘मटेरियल सायन्स हे माझ्या आवडीचे संशोधनाचे क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात दर्जेदार संशोधनकार्य करता आले. त्या कामाचे हे फलित आहे. मात्र, आकडेवारीपेक्षा सातत्यपूर्ण संशोधन करीत राहणे हे मला महत्त्वाचे वाटते. मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी आहेत. शिवाजी विद्यापीठ या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर आहे. ही आघाडी टिकविण्यासाठी नवसंशोधकांना प्रेरित करीत राहणे आवश्यक आहे.’
………………………..
‘‘डॉ. प्रमोद पाटील यांचे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक कठोर परिश्रमाचे द्योतक नाही, तर शिवाजी विद्यापीठ परिवारासाठी आणि एकूणच भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाची प्रतिष्ठा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वृद्धिंगत झाली आहे. त्यांचे हे यश विद्यापीठातील युवा संशोधकांना दर्जेदार संशोधनासाठी प्रेरित करेल.”
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ