महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शैक्षणिक उपक्रमांची रेलचेल आणि शिष्यवृत्ती परीक्षेत वेगळा पॅटर्न निर्माण केलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आता सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यासाठी प्रयत्नशील आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे पहिलीपासून १२० शाळेत व सहावीपासून २५८ शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचे वर्ग भरतील.
आजरा तालुक्यात ३१ , चंदगड ४१ , गडहिंग्लज २० , हातकणंगले ९ , शिरोळ ३९, करवीर १९, कागल ५९, पन्हाळा ६२, शाहूवाडी २७, राधानगरी ३०, भुदरगड २८, गगनबावडा १३ तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. पन्हाळा आणि कागल तालुक्यात सर्वाधिक शाळा असतील. इंग्रजी माध्यमातून डीएड शिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार आहेत. बीएस्सी, बीएड अभ्यासक्रम शिकलेले शिक्षक कार्यरत असलेल्या शाळांमध्ये सहावीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग भरतील.
सीईओ कार्तिकेयन एस यांनी जिप शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण समितीला सूचना केल्या होत्या. शिक्षण समितीने यासंबंधी शिक्षण संचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला होता. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे.