महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय व केआयटी आयएमईआर यांच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत २०२४ ते २०२७ या काळासाठी संस्थेचे अध्यक्ष म्हणून साजिद हुदली, उपाध्यक्षपदी सचिन मेनन, सचिवपदी दीपक चौगुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. केआयटी आयएमईआर च्या संचालक विश्वस्तपदी सुनील कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या ३ वर्षाच्या कॉलेजच्या वाटचालीवर संचालक मंडळांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही प्रगतीसाठी संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे नूतन अध्यक्ष साजिद हुदली यांनी आगामी काळात केआयटी संशोधनाचे केंद्र बनेल तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवेल याबाबत सर्व संचालक मंडळाला आश्वस्त केले. यावेळी संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष साजिद हुदली म्हणाले, "राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जात्मक संशोधन व विकासाचे केआयटी हे केंद्र बनेल. ‘स्टार्टअप्स’ च्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आर्थिक मदतीसह तांत्रिक मार्गदर्शन करून तो व्यवसाय प्रत्यक्षात येण्यासाठी संबंधितांना केआयटी मोठे बळ देईल."