बिद्री कारवाईच्या निषेधार्थ गारगोटीत मोर्चा, आबिटकरांविरोधात घोषणा
schedule09 Jul 24 person by visibility 264 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री दूधगंगा –वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावरील (बिद्री) कारवाईवरुन चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. माजी आमदार पाटील समर्थकांनी बिद्रीवरील कारवाईवरुन आबिटकरांना घेरण्याची एकही संधी दवडताना दिसत नाहीत. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासद व शेतकऱ्यांचा गारगोटीत मोर्चा काढण्यात आला. तहसिलदारांना निवेदन दिले. या मोर्चात आबिटकरांवर टीका करणारे फलक आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखान्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. हुतात्मा चौकातून मोर्चा निघाला. तहसलिदार कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाटील म्हणाले, ‘आमदार आबिटकर हे कारखान्याच्या प्रगतीत खोडा घालत आहेत. या आमदारांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल.’ याप्रसंगी कारखान्याचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी कारखान्यावरील कारवाई मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेखर देसाई, रामभाऊ कळबेकर, संदीप देसाई, सर्जेराव देसाई यांची भाषणे झाली. आंदोलनात कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव, मधुकर देसाई, पंडितराव केणे, सम्राट मोरे, जगदीश पाटील, प्रकाश देसाई, शामराव देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, अनिल तळकर, एस. एम. पाटील, एम. डी. पाटील, पांडूरंग कदम, सुनील कांबळे, विश्वनाथ कुंभार आदी उपस्थित होते.