महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद झाला. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. सरकारकडून शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला. कोल्हापुरात लवकरच शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात परिषद घेण्याची घोषणाही केली.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन केले होते. "शक्तीपीठ महामार्ग हा कोणाच्या उत्कर्षासाठी आहे हे एकदा सरकारने जाहीर करावे. कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ होऊ देणार नाही हा आमचा निर्धार कायम आहे" असे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम राहील असे ठणकाले. आंदोलनस्थळी "शेतकरी एकजुटीचा विजय असो, एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द, शेती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची" अशा घोषणा देण्यात आल्या. खासदार शाहू महाराज म्हणाले, "शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रारंभापासून विरोध आहे. लोकांची मागणी नसताना सरकार हा शक्तिपीठ महामार्ग कशाला तयार करत आहे. सरकारने भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग जनतेला नको आहे. कोणत्याही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे अशी इच्छा नाही. शक्तिपीठ महामार्ग कोणासाठी आहे हे जनतेच्या लक्षात येत आहे. शेतकऱ्यांनी एकत्र राहून सरकारवर दबाव टाकून शक्तीपीठ महामार्ग रद्द करू या. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील" याप्रसंगी इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, प्राचार्य मधुकर बाचुळकर आदींची भाषणे झाली. आंदोलनात मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.