न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र
schedule04 Jul 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाजी पेठ येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, तसेच प्रवेश संदर्भातील सर्व मदत विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. ही सुविधा पूर्णपणे निःशुल्क असून प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे. सोबत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी देखील मार्गदर्शन व मदत उपलब्ध केलेली आहे.
डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांच्या अर्ज, कागदपत्रे पडताळणी व पुष्टीकरणाची प्रक्रियाही अधिकृत सुविधा केंद्रावर केली जाणार आहे. दि. १७ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी व १८ ते २० जुलै पर्यंत हरकती नोंदवणे व २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.प्रवेश प्रक्रियेबाबत तांत्रिक अडचणी, प्रवेश फेऱ्यांबाबत सर्व माहिती मार्गदर्शन येथे केले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होणे हा सुविधा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. डी फार्मसी प्रवेशासाठी प्रवेशइच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी केले आहे.