पुढील वर्षी आनंदराव पाटील चुयेकरांच्या स्मृतिदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करणार
schedule16 Jan 26 person by visibility 48 categoryउद्योग
गोकुळमध्ये वीस लाख लिटर दूध संकलनपूर्ती समारंभ उत्साहात
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘म्हैस दूध वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठी भूमिका घेतली असून दोन जातिवंत म्हैशी खरेदीसाठी गोकुळच्या सुपरवायझरच्या शिफारशीवर विनातारण कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच इतर महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूध उत्पादकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच स्वर्गी्य आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाने अमृत कलश पूजन होईल,असा मला पूर्ण विश्वास आहे.’’ असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्य प्रतिदिन २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे झाला. हा अमृत कलशाचे पूजन गोकुळ मध्ये कार्यरत असलेले ११ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले,‘गोकुळचे एकूण अर्थकारण शेतकऱ्यांच्या हिताशी थेट जोडलेले असून, त्यामुळेच हा संघ सर्वसामान्य दूध उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सत्तेवर आल्यानंतर त्या काळात गोकुळचे दूध संकलन १२ ते १३ लाख लिटर इतके होते. मात्र, २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे केला आणि तो आज यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. आज महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दूध संघांमध्ये गोकुळचा अग्रक्रम लागतो.
आमदार सतेज पाटील म्हणाले, “आज गोकुळ दूध संघाने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीची, विश्वासाची आणि संघाच्या सक्षम नेतृत्वाची पावती आहे.
चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला हा क्षण गोकुळ कुटुंबासाठी अभिमानाचा आहे.’याप्रसंगी गोकुळ प्रकल्प येथे नवीन बसवण्यात आलेल्या २ मेट्रिक टन प्रतितास क्षमतेचा अत्याधुनिक कंटीन्युअस बटर मेकींग मशिन, २००० केव्हीए नवीन जनरेटर सेट व गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी टी.एम.आर.प्लांट विस्तारीत युनिट कार्यान्वित करण्यात आले. संचालक अरुण डोंगळे स्वागत केले. संचालक विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके,, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.