केआयटीची जागतिक झेप; वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करार
schedule16 Jul 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविणाऱ्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने जागतिक शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील क्यूएस (QS ) जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ७७ व्या स्थानावर असलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. हा करार २ जुलै रोजी हायब्रिड बैठकीत औपचारिकरित्या पार पडला. या करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन संस्कृती आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या करारावर केआयटीचे सचिव दीपक चौगुले आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. जेनिफर हॉवेल यांनी आभासी माध्यमातून स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, आंतरराष्ट्रीय संबंध अधिष्ठाता डॉ. रोहन नलवडे तसेच वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे भारतातील प्रोजेक्ट ऑफिसर प्रणव देसाई उपस्थित होते.
डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले की, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून भारत–ऑस्ट्रेलिया संयुक्त संशोधन निधीचा प्रभावी वापर करण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचा प्रस्ताव असून, उदयोन्मुख आणि अपारंपरिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्येही स्वतंत्र उत्कृष्टता केंद्रे विकसित करण्याची योजना आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधील निधीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. रोहन नलवडे यांनी विशेषतः सायबर सिक्युरिटी विषयातील मायक्रो-क्रेडेन्शियल अभ्यासक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्राध्यापक व संशोधकांची देवाणघेवाण, तसेच ऑस्ट्रेलियामधील इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यावर या करारात विशेष भर राहील असे सांगितले. केआयटीचे सचिव चौगुले यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरराष्ट्रीयीकरण या महत्त्वाच्या उद्दिष्टाची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण व करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या केआयटीच्या प्रयत्नांना या करारामुळे नवी दिशा आणि अधिक गती मिळणार आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन व अन्य विश्वस्तांचे प्रोत्साहन लाभले.