प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकसेवा घडल्याचे मोठे समाधान-अजयकुमार माने
schedule01 Oct 24 person by visibility 290 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकसेवा करता आली. सरकारी सेवेच्या ३२ वर्षाच्या गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, अतिरिक्त मुख्य कार्यक्रम अधिकारी अशा विविध पदावरील कामाचा अनुभव हा समृद्ध करणारा होता.”असे भावोत्कट उद्गगार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार सतीशराव माने यांनी काढले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माने हे ३२ वर्षे दोन महिनेच्या सरकारी सेवेतून ३० सप्टेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवृत्त पोलिस अधिकारी आर. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. नागाळा पार्क येथील बालाजी गार्डन येथे सदिच्छा समारंभ झाला. याप्रसंगी अजयकुमार माने व शीला माने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित अधिकाऱ्यांनी, माने यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
माने यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील बस्तवडे. वालचंद कॉलेज येथून १९८७ मध्ये बींई सिव्हिल झाले. शिवाजी विद्यापीठात ते सर्वप्रथम होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत जुलै १९९२ मध्ये गटविकास अधिकारी म्हणून नोकरीत रुजू झाले. गटविकास अधिकारी म्हणून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गडहिंग्लज, खानापूर-विटा, तासगाव, हातकणंगले, मिरज येथे ९ वर्षे काम केले. सांगली व कोल्हापूर जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाच वर्षे काम केले. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापुरात प्रकल्प संचालक म्हणून चौदा वर्षे काम केले. गेली साडेचार वर्षे ते कोल्हापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली.
माने यांनी सत्काराला उत्तर देताना विविध ठिकाणच्या कामातील अनुभव, वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाबासकीची थाप हे सारे उपसथितांशी शेअर केले. सांगली जिल्हा परिषदेत कार्यरत असताना स्वच्छ भारत अभियान अतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल मे २०१७ मध्ये सिनेअभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते माने यांना पुरस्कारांनी सन्मानित केले होते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाँडेझरी येथील पारधी समाजासाठी ५० घरकुले व कोल्हापुरातील उचगाव येथील शांतीनगरमध्ये पारधी समाजासाठी २५ घरकुलाची उभारणी हे काम माझ्यासाठी वेगळे समाधान देणारे ठरले. सरकारी सेवेत चांगले काम केले की लोक प्रचंड प्रेम करतात याची प्रचिती वारंवार आली असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, वरिष्ठ पोलिस अधिकारी जयश्री देसाई, यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रकल्प संचालक सुषमा देसाई, वित्त व लेखा अधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, स्वच्छता मिशनच्या संचालक माधुरी परीट, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार, कृषी अधिकारी अभयकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.