महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर :
इस्तांनबुल, तुर्की येथे पार पडलेल्या यासर्गील माक्रो न्युरो सर्जरी कॉंग्रेस येथे डॉ. शिवशंकर मरजक्के यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष आमंत्रित केले होते. या परिषदेत डॉ. मरजक्के यांनी मेंदूतील अंत्यत जटील आणि जीवघेण्या अशा मेंदूच्या एन्युरीझम शस्त्रक्रियेवर शोध निबंध सादर केला. या परिषदेला मायक्रो न्युरोसर्जरीचे जनक म्हणून विख्यात असणारे डॉ. प्रो. गाझी यासरगील स्वतः उपस्थित होते. याच परिषदेत त्यांचा ९९ वा जन्मदिन साजरा करण्यात आला. या परिषदेला ४८ देशातील निवडक एक हजार न्युरो सर्जन यांना आमंत्रित करण्यात आले होते. भारतातून केवळ दहा न्युरो सर्जनची निवड या परिषदेसाठी करण्यात आली होती, त्यात सर्वात तरुण भारतीय न्युरो सर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांची निवड झाली होती.
या परिषदेमध्ये भारतातल्या कणेरी सारख्या एका ग्रामीण भागात कार्यरत असणा-या हॉस्पिटलमध्ये जटील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रक्रिया होतात याचे जगभरातील प्रख्यात न्युरो सर्जननी आश्चर्य आणि कौतुक केले. या परिषदेतील यशामुळे सिद्धगिरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर येथील न्यूरो विभाग आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर ठळकपणे आले आहे.
या परिषदेतील यशामुळे कोल्हापूर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. मरजक्के यांना चार ते पाच विकसित देशातून यापुढील आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तुर्की येथील या परिषदेसाठी काडसिद्धेश्वर महास्वामी यांचे त्यांना आशीर्वाद लाभले.