राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण २१८५ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र द्या : चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
schedule08 May 21 person by visibility 252 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. याच काळामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी महाराष्ट्र राज्यात विविध विभागांच्या भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्या. परंतु कोविड या एकाच कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्रक दिली नाहीत. त्यामुळे राज्यातील जवळपास २१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री या नात्याने २१८५ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण गांभीर्यपूर्ण विचार करून उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकरात लवकर मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे केली आहे.
मेलमध्ये म्हटले आहे, ‘त्याचबरोबर ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख आहे.
सध्या लॉकडाऊन, कोरोना संकट, बेरोजगारी अशा परीस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवून देखील त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. ’