माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचे निधन
schedule04 Aug 26 person by visibility 158 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डी वाय पाटील शैक्षणिक समूहाचे संस्थापक, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मेडिकल अभियांत्रिकी फार्मसी कृषी अशा विविध क्षेत्रात त्यांच्या संस्था कार्यरत आहेत.
डी. वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी झाला होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या संस्था उभ्या केल्या. सुरुवातीच्या काळात ते राजकारणातील सक्रिय होते. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. नंतरच्या कालावधीत राजकारणापासून बाजूला होत त्यांनी पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले होते. देशातील विविध शहरात त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे कुटुंबीय पुढे चालवित आहेत. पाटील कुटुंबीयांची दुसरी तिसरी पिढी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कृषी, सेवा अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. कुटुंबातील सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील, आमदार सतेज पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू माजी आमदार ऋतुराज पाटील हे राजकारण व सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.