मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणारा प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठाकडे तक्रार !
schedule29 Sep 24 person by visibility 2038 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्चशिक्षित व बुद्धीजीव वर्ग म्हणून प्राध्यापकाची ओळख. उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत या मंडळीकडून गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन व लेखन या कामगिरीची अपेक्षा. अनेक प्राध्यापक मंडळी अध्यापन, संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने कामगिरी करत असतात. अशा विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांची संख्या ही मोठी आहे. मात्र काही मंडळींची कामगिरी नेमकी उलटी. तास न घेणे, अध्यापन कमी उठाठेवी जास्त, संशोधनाचा तर पत्ताच नाही. यावर कहर म्हणजे, चार दिवसापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या आवारातच एका प्राध्यापकाने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. धिंगाणा घालणाऱ्या प्राध्यापकाच्या या वर्तनासंबंधी शिवाजी विद्यापीठाकडे तक्रारी दाखल झाली आहे.
गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला. संबंधित प्राध्यापक व आणखी एक सहकारी, दुचाकीवरुन शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर गेले. विद्यापीठात जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज सायंकाळी सहा वाजता संपते याचे ही भान त्यांना नव्हते. कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला सुट्टी झाली आहे असे सांगत त्या प्राध्यापकांना अडविले. त्यावेळी त्या प्राध्यापकाने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. ‘मी कोण आहे, तुम्हाला माहित नाही का ? ’अशी अरेरावी केली.
यामुळे सुरक्षा कर्मचारी व त्या प्राध्यापकांत हमरीतुमरी झाली. कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद झाला. प्रकरण हातघाईपर्यंत गेले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा प्रकार सुरक्षा विभागाचे अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना सांगितला. सुरक्षेसाठी असलेल्या वाहनातून त्या प्राध्यापकाला अधिकाऱ्यांच्याकडे घेऊन गेले. तेथेही त्यांची बडबड सुरू होती. तो प्राध्यापक मला होस्टेलला जायचे असे म्हणून दंगा करत होता. त्या ठिकाणीही त्यांनी दंगा केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या प्राध्यापकाला रात्री उशिरा पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी समज दिली. उशिरापर्यंत स्टेशनमध्ये बसवून ठेवले.
दरम्यान विद्यापीठाच्या आवारात धिंगाणा घालणारा हा प्राध्यापक काही दिवसापासून चर्चेत आहे. शहरातील एका कॉलेजमध्ये कार्यरत आहे. प्राध्यापकाने विद्यापीठ आवारात केलेल्या सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचे फुटेज प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. आता हे प्रकरण काय वळण घेणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. संबंधित प्राध्यापकाच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आता ‘मला माफ करा‘अशी विनवणी सुरू केली आहे.