जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
schedule15 Apr 26 person by visibility 147 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद येथे साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जस्मिन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
सीईओ जस्मिन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा सविस्तर आढावा घेतला. डॉ.आंबेडकर यांनी समाजातील वंचित, शोषित व दुर्बल घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष करुन त्यांना न्याय व समानतेचा अधिकार मिळवून दिला. शिक्षण, सामाजिक समता, बंधुता व न्याय या मूल्यांच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या कार्यात पारदर्शकता, जबाबदारी व सेवाभाव ठेवण्याचे आवाहन केले. डॉ. आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असून त्यांच्या आदर्शांवर चालत प्रशासन अधिक लोकाभिमुख व प्रभावी बनविणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिट, शिक्षणाधिकारी श्रीमती सुर्वणा सावंत, शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेंडकर, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश् मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. प्रा. सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.