गोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!
schedule21 Sep 26 person by visibility 20 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी, (२१ सप्टेंबर २०२६) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. गोकुळच्या संचालकपदाच्या २५ जागेसाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलपर्यंत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सर्वसाधारण गटातून गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक हातकणंगले, आजरा तालुक्यातून अशोक चराटी, करवीर तालुक्यातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, शिवाजी तोडकर, कळंबा येथील रामचंद्र भोगम, कागल तालुक्यातून गोकुळचे माजी संचालक अंबरीश घाटगे, दिग्विजय प्रवीणसिंह पाटील, गडहिंग्लज तालुक्यातील शिवशंकर हत्तरकी, प्रकाश चव्हाण, चंदगड तालुक्यातून दीपक पाटील, पन्हाळा तालुक्यातून गोकुळचे माजी संचालक चेतन नरके, भुदरगड तालुक्यातून धैर्यशील देसाई, नाथाजी पाटील, देवराज बारदेस्कर, राधानगरी तालुक्यातून रविश पाटील, विजय जाधव, गोविंदा दादू चौगुले आणि शिरोळ तालुक्यातून अजित शहापुरे यांचे उमेदवारी अर्ज आहे. महिला गटातून आजरा तालुक्यातील पद्मजा आपटे, करवीर तालुक्यातून रूपाली तानाजी पाटील, सुनिता रघुनाथ पाटील कागल तालुक्यातून सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, गडहिंग्लज तालुक्यातून कविता हत्तरकी, श्वेता हत्तरकी, चंदगड तालुक्यातून ज्योती दीपक पाटील यांचे अर्ज आहेत. गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी सर्वसाधारण व महिला गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव यांनी भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातून अर्ज दाखल केला. वाळवे खुर्द येथील भूषण पाटील यांचाही उमेदवारी अर्ज आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील बाबासो आण्णासो पाटील, शिरोळ येथील आप्पा गावडे आणि कवठेगुलंद येथील मल्लाप्पा चौगुले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी महायुती म्हणूनच निवडणूक लढविली जाईल असे यापूर्वीच नेतेमंडळींनी स्पष्ट केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी कोल्हापुरात भाजप नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले होते. त्यानुसार भाजपतर्फे गोकुळसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. मात्र इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने यादी लांबत गेली
सकाळी १०.३० वाजता भाजपाचे नेते, इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजप कार्यालयातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडले. याप्रसंगी महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन पी जी शिंदे, प्रा. जयंत पाटील, महिला आघाडीच्या स्वाती पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती सावकार मादनाईक, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, भगवान काटे, राहुल चिकोडे उपस्थित होते.