कोल्हापुरातील उद्योजकाची ८१ लाखाची लूट
schedule15 Sep 24 person by visibility 253 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योजक आणि माजी नगरसेवक उदय तुकाराम दुधाणे यांना तब्बल ८१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. दहशतवादी संघटनेला मदत केल्याची भिती घालत त्या भामटयाने, कोल्हापुरातील उद्योजकांकडून आर्थिक लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुधाणे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्या भामट्याने, आपण राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी असल्याची बतावणी करत दुधाणे यांची फसवणूक झाली. सहा ते अकरा सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोल्हापुरात गेल्या काही महिन्यात अशा प्रकारचे तीन प्रकार घडले आहेत.
दुधाणे हे अंबाई डिफेन्स परिसरात राहतात. त्यांच्या मोबाइलवर सहा सप्टेंबर रोजी व्हॉटसअप कॉल आला. त्यावेळी समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपण एनआयएचा अधिकारी आहे. हैदराबादमधील एका दहशतवादी संघटनेसाठी १२२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्या रकमेतून शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. त्या रकमेसाठी तुमच्या खात्यात २० ते २२ कोटी रुपये जमा झाले. तुमचे हे कृत्य देशविघातक आहे. तुमच्या जीवितीला धोका आहे. आमचे तुमच्यावर लक्ष आहे. कोर्टाच्या आदेशानुसार तुम्ही ऑनलाइन अटकेत आहात. सुरक्षेसाठी तुम्ही एका हॉटेलमध्ये राहा असे सांगितले.
हे ऐकून दुधाणे हे घाबरले. भितीपोटी त्यांनी शिवाजी पार्क येथील एका हॉटेलमध्ये राहावयास गेले. पुन्हा त्या भामटयाने, मोबाइलवरुन संपर्क साधत आपण एनआयए अधिकारी बोलत आहोत. या गंभीर गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करावी असा दम भरला. त्यानुसार दुधाणे यांनी तब्बल ८१ लाख रुपये बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे भरली. शिवाय आधार कार्ड नंबर, पॅन नंबरची माहिती दिली. दुधाणे यांच्याकडून रक्कम पोहोच झाल्यानंतर त्या भामटयाकडून येणारे फोन बंद झाले.दरम्यान दुधाणे यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन आर्थिक फसवणूक झाल्याविषयी फिर्याद दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुधाणे हे कोल्हापुरातील नामांकित उद्योजक आहेत. गोशिमाचे माजी अध्यक्ष आहेत.