एमआयडीसीचा ६२ वा वर्धापनदिन उत्साहात ! उद्योजकांची उपस्थिती, कर्तबगारांचा सत्कार !!
schedule01 Aug 24 person by visibility 332 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा अर्थात एमआयडीसी चा ६२ वा वर्धापन दिन सोहळा कोल्हापूर विभागातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. हॉटेल पॅव्हेलियन येथे कार्यक्रम झाला. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, कोषाध्यक्ष सुरेश शिरसागर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रसन्न तेरदाळकर, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनियरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक अनिल धडाम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.
एमआयडीसीचे उपअभियंता अजयकुमार रानगे यांनी प्रास्ताविक केले. एका वागळे इस्टेट या क्षेत्रापासून १९६२ मध्ये सुरु झालेली एमआयडीसी आज राज्यात २८९ औद्योगिक क्षेत्रे कार्यरत आहेत व आशिया खंडातील सर्वात मोठे पाणीपुरवठा वितरण जाळे निर्माण केले असल्याचे त्यांनी नमूद केले. हरिचंद्र थोत्रे यांनी महाराष्ट्रास धडाडीचे उद्योग मंत्री लाभल्याने १५६ कोटींचा निधी कोल्हापूर जिल्ह्याला दिला व मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी उद्योजक हा केंद्रबिंदू मानून दर्जेदार सुविधा आणि त्यांच्या अडचणींना सोडविण्यास सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे अशा भावना व्यक्त केल्या. प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांनी नवीन भूसंपादन करून उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
डीआयसीचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी आहे, पण त्याचा अतिरेकी वापर उदाहरणार्थ मोबाईल व त्यातील गेम्सचा अतिरेकी वापर घातक आहे. भावी पिढी सुसंस्कृत करण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज असल्याचे नमूद केले.यावेळी स्पर्धा व शालेय परीक्षेत यश मिळवलेले विधार्थी तसेच विविध उद्योग व्यवसायात यशस्वी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. शैलेश कुरणे यांनी सूत्रसंचालन केले. उपअभियंता सुनिल अपराज यांनी आभार मानले.