शहरातील २१ संघटना एकवटल्या, क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूरची स्थापना !
schedule30 Aug 24 person by visibility 202 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शहरातील २१ संघटना एकवटल्या. या साऱ्यांनी एकत्र येत क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूरची स्थापना केली आहे. क्रीडा संघटनांच्या या शिखर संस्थेचा प्रारंभ व लोगो अनावरणाचा कार्यक्रम गुरुवारी (२९ ऑगस्ट) पार पडला. या समारंभात बोलताना अनेकांनी, खेळाच्या विकासाचा कृती आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.
खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा समारंभ झाला. याप्रसंगी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी, ‘सरकारकडून क्रीडा क्षेत्राला चालना मिळायला हवी. महत्वाचे म्हणजे, खेळा हा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता तो जिल्हाभर पसरला पाहिजे.’असे नमूद केले. खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, आनंद माने यांनी मनोगत व्यक्त केले. क्रीडा प्रतिष्ठानचे निमंत्रक बाळ पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी महापौर महादेवराव आडगुळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, केएसएचे माणिक मंडलिक, जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे संचालक शरद बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक सतीश घाटगे यांनी आभार मानले.