उदयनराजेंचा कोल्हापुरात रोड शो, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
schedule08 Apr 22 person by visibility 1003 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : हलगीचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, भाजपाच्या विजयाच्या घोषणा आणि नागरिकांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात खासदार उदयनराजे भोसले यांचा रोड शो कोल्हापुरात झाला. शुक्रवारी सायंकाळी उत्साहात हा रोड शो झाला.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित उदयनराजे यांच्या रोड शोला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून रोड शोला सुरुवात झाली. खासदार उदयनराजे भोसले, उमेदवार सत्यजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोड शो ला सुरुवात झाली. निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक ते छत्रपती शिवाजी चौक असा रोड शो निघाला.
या रोड शोमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग होता. गळयात भगवे उपरणे, हाती भगवा झेंडा आणि सत्यजित कदम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात येत होत्या. माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, तुकाराम इंगवले, प्रताप देसाई, अजय हारुगले, राजेंद्र जाधव, श्रीकांत भोसले आदींचा सहभाग होता.