कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करा : आमदार जयश्री जाधव
schedule05 Jul 24 person by visibility 254 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करावी अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अधिवेशन काळात आमदार जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महापालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. सद्य:स्थितीत कोल्हापूर महापालिकेची हद्द ६६.८२ चौरस किलोमीटर आहे. एवढ्या कमी जागेत तब्बल सात लाख लोक राहातात. शहराची उभी वाढ होत असताना शहर आडवे वाढण्याची गरज आहे. मात्र शासनाच्या चुकीच्या उदासीन धोरणामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलने केले आहे. परंतु सरकारने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन शहराची हद्दवाढ करावी.