भारावलेला भगवा चौक... शिवरायांचा जयजयकार... स्फुल्लिंग चेतविणारे वातावरण अन् राहुल गांधींचे तडाखेबंद भाषण
schedule05 Oct 24 person by visibility 866 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजीचा अखंड गजर... शिवरायांचा जयजयकार.... शिवभक्तांचा ओसांडून वाहणारा उत्साह...स्फुल्लिंग चेतवणारे वातावरण अशा भारावलेल्या सोहळ्यात कसबा बावडा येथील भगवा चौकात शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळाच्या अनारणाचा कार्यक्रम रंगला. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आगमन होताच कार्यक्रमात जोश भरला. राहुल गांधी यांनी दहा मिनिटांच्या भाषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कार्यांची महती सांगितली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारकार्याचे प्रतिबिंब संविधानामध्ये उमटले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून शिवरायांच्या विचार कार्याचा अखंड जागर होत राहील. आपली लढाई ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची, सर्वांना समान न्याय देण्याची आणि संविधान वाचविण्यासाठी आहे. शिवरायांच्या चरित्रातून या साऱ्याची शिकवण मिळते असे उद्गार राहुल गांधी यांनी काढतात पुन्हा एकदा सारा परिसर जय शिवाजी जय भवानी या घोषाने दुमदुमला. कडक उन्हाची तमा न करता हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या सुवर्ण सोहळ्याला हजेरी लावली
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व डी वाय पी ग्रुप यांच्या पुढाकारातून कसबा बावडा येथील भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारला आहे.. या पुतळ्याचे अनावरण शनिवारी झाले. या पुतळा नावरणासाठी राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थित होती. सकाळपासून साऱ्यांच्या नजरा राहुल गांधी यांच्या आगमनाकडे लागून होत्या. कसबा बावडा परिसर या पूर्णाकृती पुतळाच्या सोहळ्यासाठी सज्ज होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राहुल गांधींचे भगवा चौक येथे आगमन होताच सारा माहोल बदलून गेला. आमदार सतेज पाटील व खासदार शाहू छत्रपती यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपला नियोजितद्वारा शुक्रवारी होता परंतु विमानात बिघाड झाल्यामुळे आपण येऊ शकलो नाही याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य साऱ्यांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. सर्वांना सोबतीला घेऊन सर्वांना न्याय ही भूमिका ठेवली. त्यांच्या या विचारसरणीची आजही नितांत गरज आहे. शिवाजी महाराज व शाहू महाराज यांची विचारधाराच संविधानात आहे. काही मंडळी शिवरायांचे नाव घेतात पण संविधानाला धोका पोहोचवतात असा टोलाही त्यांनी नाव न घेता केंद्रातील भाजप राजवटीला लगावला. आपली लढाई केवळ राजनैतिक नाही तर वैचारिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ज्या विचारधारेने विरोध केला, ती विचारधारा आजही संविधानाच्या विरोधात आहे. आपण संविधान वाचवण्यासाठी एकत्र आहोत. समता, समानता, न्याय यासाठी आपली लढाई आहे. असे तडाखेबंद भाषण करत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला
दहा मिनिटाच्या भाषणामध्ये गांधी यांनी देशातील सद्यस्थिती, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमान यावरून केंद्रातील सरकारचा चांगलाच समाचार घेतला. पुतळा पडल्याच्या प्रकरणावर बोलताना त्यांची नियत चांगली नव्हती अशा शब्दातही त्यांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांना फटकारले. त्यांच्या भाषणानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सारा परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दुमदुमला.
या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, कुमार चौधरी, नसीम खान, उल्हास पवार, आमदार भाई जगताप, विश्वजीत कदम, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राजू आवळे, जयंत आसगावकर, युवराज मालोजीराजे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. डी वाय पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन साऱ्यांचे स्वागत केले. आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती भेट दिली. मानसिंग जाधव यांनी आभार मानले.