जिप शाळेत कम्प्युटर प्रयोगशाळा ! महिलांना स्वयंरोजगारासाठी पिको फॉल मशिन !!
schedule10 Sep 24 person by visibility 330 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिला व बाल कल्याण विभागाकडील ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील महिलांना स्वयंरोजगारासाठी पिको फॉल मशिन खरेदी करणे योजनेला कोल्हापूर जिल्हा परिषदेत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा निर्माण करणेस मंजूरी देण्यात आली.
या सभेत आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे ठरले. त्यानसार अकरा आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढण्यासाठी संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यास मंजूरी देण्यात आली. या सभेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा २०२३-२४ या वर्षाचा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द करण्यास मंजूरी देण्यात आली.
कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग इ. विभागांचे जिल्हा परिषद स्वनिधीतील सन २्०२४-२५ चे पहिल्या पुनर्विनियोजन अर्थसंकल्पमधून पुनर्विनियोजन अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.ग्रामपंचायत विभागाकडील विविध इमारतींना निर्लेखन करणेस मंजूरी देण्यात आली.प्राथमिक शिक्षण विभागाकडील विविध तालुक्यातील शाळांच्या वर्ग खोल्या निर्लेखन करण्यात मान्यात देण्यात आली.
महिला व बाल कल्याण विभागाकडील अंगणवाडयांना विविध साहित्य पुरविणे अंतर्गत – डिजीटल टि.व्ही. स्टडी टेबल, थिमॅटीक वॉल प्रिंन्ट, डस्टबीन (तीन रंगात) रंगकाम यासारखे साहित्य खरेदी करणे योजनेला प्रशासकिय व तांत्रिक मान्यता दिली. बांधकाम विभागाकडील विविध योजनांमधील कामांच्या निविदांना मंजुरी मिळाली. या सभेत प्रशासक कार्तिकेयन एस यांनी, अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करुन प्राप्त निधी अखर्चित राहणार नाही यासंबंधी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अर्जुन गोळे, पाणी व स्वच्छता मिशन विभाग संचालक माधुरी परीट, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार, कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर उपस्थित होत्या.