कोल्हापूरकरांचा रेल्वे प्रवास वेगावणार, सोमवारपासून कोल्हापूर पुणे वंदे भारत धावणार !
schedule15 Sep 24 person by visibility 419 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेले काही दिवस प्रतिक्षा लागून राहिलेल्या कोल्हापूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेस सोमवार 16 सप्टेंबर 2024 पासून धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोल्हापूर ते पुणे हा प्रवास साडेपाच तासात होणार आहे. या एक्सप्रेसमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर ते पुणे नंतर लवकरच कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
अत्यंत आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशी वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये आहेत. आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर ते पुणे आणि तीन दिवस पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 8:15 मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून सुटणार आहे. दुपारी एक वाजून 30 मिनिटाला पुणे रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. प्रत्येक बुधवारी, शुक्रवार, आणि रविवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून सुटेल आणि सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला कोल्हापुरात पोहोचेल. दरम्यान कोल्हापूरहून रेल्वे सुटल्यानंतर मिरज सांगली किलोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर वंदे भरत एक्सप्रेसचा थांबा आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण आठ डबे आहेत. त्यामध्ये सात चेअर कार आणि एक एक्झिक्यूटिव्ह क्लास असेल. पाच डब्यामध्ये प्रत्येकी 78 तर इंजिन जवळच्या दोन्ही बाजूंच्या डब्यात प्रत्येकी 44 आणि एक्झिक्यूटिव्ह क्लासमध्ये 52 प्रवाशांची आसन क्षमता आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या एका फेरीतून 530 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. प्रति व्यक्ती 1135 रुपये आणि एक्झिक्युटीव्ह क्लाससाठी दोन हजार रुपये इतके तिकीट दर आहे.
सोमवारी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी रेल्वे राजमंत्री श्री व्ही सोमन्ना हे उपस्थित राहणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेससाठी गेले अनेक महिने प्रयत्न सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मोलाची साथ लाभली असे महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, महिला आघाडीच्या रूपाराणी निकम आणि रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणी उपस्थित होते.