हेरवाडच्या तरुणांनी धरली दुग्ध व्यवसाय वाढीची कास, गोकुळच्या चेअरमनांकडून कौतुक !
schedule24 Sep 24 person by visibility 2007 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील श्रीसंतूबाई दूध संस्था ही गोकुळशी सेंलग्न. या दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी दुग्ध व्यवसाय वाढीसाठी हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीच्या म्हैशी आणल्या. त्यांचा दुग्ध व्यवसाय जोमाने करायचा हा पक्का इरादा. त्यांच्या या इराद्याचे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी विशेष कौतुक केले.
श्रीसंतूबाई सहकारी दूध संस्थेतर्फे अयोजित कार्यक्रमाात परराज्यातून जातिवंत म्हैशी खरेदी केलेल्या दुध उत्पादकांच्या सत्कार करण्यात आला. या दूध उत्पादकांनी ५८ म्हैशी आणल्या आहेत. याप्रसंगी बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘ दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढत आहे. गोकुळ दूध संघाचे पाठबळ, अनुदान योजना , सेवा सुविधा यामुळे अनेकांनी दुग्ध व्यवसाय करत आहेत. तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक ठरू शकतो.गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत दूध उत्पादकानी परराज्यातून मुऱ्हा जातीच्या ५८ म्हैशी खरेदी केल्या हि निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. गोकुळच्या विविध योजनाचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घेउन म्हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करावेत.’
याप्रसंगी श्री संतूबाई सहकारी दूध संस्थेचे दूध उत्पादक किसन माळी, बजरंग बरगाले, शकील जमादार, दिलीप माळी, दिनकर माळी, विजय पाटील, अरविंद पाटील यांचा चेअरमन डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी, संस्थेचे पदाधिकारी, गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील, सुहास डोंगळे, राहुल राजमाने अनिल पाटील आदी उपस्थित होते