तालीम संघाने उभारले मल्लांसाठी होस्टेल ! साकारला वस्ताद बाळ गायकवाड यांचा पुतळा !!
schedule06 Feb 25 person by visibility 429 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे वस्ताद बाळासाहेब राजाराम तथा बाळ गायकवाड यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. तसेच मल्लांसाठी ‘लोकनेते सदाशिवराव मंडलिक वसतिगृह’ची बांधणी केली आहे. तालीम संघातर्फे, रविवारी (९ फेब्रुवारी २०२५) पुतळयाचे अनावरण व वसितगृहाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व जनरल सेक्रेटरी महादेवराव आडगुळे यांनी दिली.
मिरजकर तिकटी परिसरातील मोतीबाग तालीम येथे सकाळी दहा वाजता हा समारंभ होत आहे. मल्लांसाठीचे वसतिगृह मोतीबाग तालीम परिसरात बांधलेले आहे. या होस्टेलचे उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी आमदार सतेज पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नव्याने बांधलेल्या वसतिगृहात १०० मल्लांच्या निवासाची सोय होईल. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मोतीबाग तालीममध्ये बांधलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट हॉलसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मंजूर करुन आणले होते. तसेच भारतीय खेल प्राधिकरणमार्फत मॅट देखील उपलब्ध केले आहे. त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी नवीन होस्टेलला ‘लोकनेते सदाशिवराव मंडलिक वसतिगृह’नाव दिले आहे.
मल्लांच्या वसतिगृहासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी वीस लाखाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपब्लध केला आहे. खासदार शाहू महाराज यांनी वसतिगृह बांधकामासाठी वीस लाखाची देणगी दिली आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी सदाशिवराव मंडलिक ट्रस्टमार्फत तीस लाखाची देणगी दिली आहे. आमदार सतेज पाटील यांनी वस्ताद बाळासाहेब गायकवाड यांच्या अर्धाकृती पुतळयासाठी एक लाखाचा निधी दिला असल्याचे तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. पत्रकार परिषेदला हिंदकेसरी विनोद चौगले, विष्णू जोशीलकर, लक्ष्मण वरुटे, अशोक माने, प्रदीप गायकवाड, पी. जी. मेढे, अशोक पोवार, प्रकाश खोत, गजानन गरुड, संभाजी पाटील, नामदेव मोळे आदी उपस्थित होते.