शाळा व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार, बारावीच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप ! हॉल तिकिटावर दुसऱ्याच विषयाचा उल्लेख !!
schedule08 Feb 25 person by visibility 287 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंगळवारपासून (११ फेब्रुवारी २०२५) बारावीची परीक्षा. विद्यार्थ्यांची अभ्यासाची एकच लगबग सुरू आहे. हॉलतिकिटे, परीक्षा केंद्र यासंदर्भात चर्चा सुरू होत असताना शनिवारी (८ फेब्रुवारी) विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील बारावीच्या १२० विद्यार्थ्यांच्या हाती हॉल तिकिटच चुकीचे पडले. कम्प्युटर सायन्स या विषयाऐवजी मराठी आणि भूगोल या विषयांचा उल्लेख हॉलतिकिटावर आढळल्याने विद्यार्थ्यांना मनस्थाप सहन करावा लागला. शाळा व्यवस्थापनाच्या या अनागोंदी कारभारामुळे अनेक विद्यार्थ्याना रडू कोसळले. निरोप समारंभासाठी एकवटलेल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर भिती, चिंती दाटली. पाल्यांच्या परीक्षेविषयीची अनिश्चिता निर्माण झाल्यामुळे पालकांनी शाळेत धाव घेऊन प्राचार्य व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील १२० विद्यार्थ्यांना कम्युटर सायन्स हा विषय बारावीसाठी निवडला आहे. कॉलेजला प्रवेश आणि परीक्षा फॉर्म भरताना याच विषयाचा उल्लेख केला. शनिवारी बारावीच्या बॅचचा निरोप समारंभ आणि हॉल तिकिट वाटप करण्यात येणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी लावली होती. विद्यार्थ्यांना हॉल तिकिट मिळाले पण त्यावर कम्प्युटर सायन्स हा विषयाचा उल्लेख नव्हता. त्याऐवजी मराठी, भूगोल विषयाचा उल्लेख होता. विषय बदलल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. त्यांनी, हा प्रकार प्राचार्या प्राजक्ता देशपांडे यांच्यासमोर मांडला. त्यावेळी त्यांनी, कम्प्युटर सायन्स या विषयाला मान्यता नसल्यामुळे भूगोल आणि मराठीचा पेपर द्यावा लागेल असे सांगितले.
एव्हाना हा प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना कळविला होता. पालकांनी शाळेत धाव घेऊन प्रवेश घेताना एक विषय आणि परीक्षेला दुसरा विषय हा काय प्रकार ? ऐनवेळी विषय बदलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण ? असा सवाल केला. शाळा व्यवस्थापनने कम्प्युटर सायन्स या विषयाला परवानगी मिळाली नसताना विद्यार्थ्यांना या विषयासाठी प्रवेश कशाच्या आधारावर दिला ? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर कोण जबाबदारी घेणार ? म्हणत प्रश्नांचा भडीमार केला. शाळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य सुर्यकांत चव्हाण हे शाळेत दाखल झाले. पालकांनी त्यांनाही जाब विचारला. हॉल तिकिटीवरील दुसऱ्या विषयाच्या उल्लेखामुळे कम्प्युटर सायन्स पेपरच्या परीक्षेविषयी अनिश्चिता निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या रडू फुटले. काही पालकांनी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची संपर्क साधला. शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी, दोन दिवसात त्या विषयाची पूर्तता करावी. कम्पुटर सायन्स विषयासंबंधीचे हॉल तिकिट देऊ असे आश्वस्त केले. बोर्डाच्या या भूमिकेने विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.