२५ सप्टेेंबरला राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद, संचमान्यता - कंत्राटी भरतीविरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार
schedule14 Sep 24 person by visibility 3261 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संंचमान्यतेचा जाचक आदेश, कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच या दिनी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे येथे शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात शिक्षक संघटनांनी एल्गार पुकारला.
वाडीवस्तीमधील विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक आदेश सरकारने रद्द करावेत यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी निर्धार केला असल्याचे म्हटले आहे. शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव (शिवाजी पाटील गट), शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व राज्याध्यक्ष विजय कोंबे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, आखिल भारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतिश कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे निलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजीद अहमद, जुनी पेन्शन संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम एड कृती समितीचे राजू सावकार जाधव, इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय महासंघ मधुकर काटोळे, एकल शिक्षक सेवा मंच राज्याध्यक्ष विकास खांडेकर, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सुर्यवंशी, एस के पाटील, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
सरकारच्या अन्यायकारक निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होवून १५ हजार शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. हा आदेश सरकारने तात्काळ मागे घ्यावेत असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेसंबंधी पंधरा मार्च २०२४ रोजीचा निर्णय वकंत्राटी शिक्षक भरती पाच सप्टेंबर रोजीचा निर्णय वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांवर अन्यायकारक आहे. हे दोन्ही निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला.