ना चर्चा -ना प्रश्नोत्तरे, विषयपत्रिकेचे अपूर्ण वाचन ! सोळा मिनिटात गुंडाळली गव्हर्मेंट बँकेची सभा !!
schedule22 Sep 24 person by visibility 744 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांची बँक म्हणून राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव बँकेची ओळख. बँकेचे कार्यक्षेत्र सहा जिल्ह्याचे. बँकेची 107 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 22 सप्टेंबर 2024 रोजी झाली. मात्र या सभेत विषय पत्रिकेवरील विषयांचे पूर्ण वाचन झाले नाही. ना सभासदांच्या प्रश्नांची चर्चा झाली, ना सभासदांच्या लेखी प्रश्नांना उत्तरे दिली गेली... सोळा मिनिटांमध्ये सभा संपली. विषय पत्रिकेवरील केवळ सात विषयांचे वाचन करत बारा विषय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात काही सभासदांनी मात्र तीव्रपणे नाराजी व्यक्त केली.
सभेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. बँकेचे सभासद नसलेले मंडळी ही हॉलमध्ये उपस्थित होते. यामध्ये एका नगरसेविकेचा पती अग्रभागी होता. संचालकांचे नातेवाईक , जे बिगर सभासद आहेत, त्यांनीही सभेला हजेरी लावल होती. बँकेचे सभासद असलेले माजी नगरसेवक ही सभेला उपस्थित होते. यामुळे बँकेचे सभासद बाहेर आणि बिगर सभासद सभागृहात असे चित्र पाहावयास मिळत होते. बैठक व्यवस्था ही अपुरी होती. प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष मधुकर पाटील यांनी गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. सभासदाभिमुख आणि पारदर्शी कामकाज करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सभासदांसाठी 21 लाख इतकी कर्ज मर्यादा आहे त्यामध्ये वाढ करून एकूण 25 लाख कर्ज मर्यादा व आठ टक्के लाभांश देण्याचे ही जाहीर केले. आकस्मिक कर्जाची मर्यादा दीड लाखावरून दोन लाख करण्यात आली. सध्या बँकेकडे 221 कोटीच्या ठेवी आहेत तर कर्ज वाटप 149 कोटी रुपयांचे केले आहे. बँकेचा व्यवसाय 370 कोटी रुपये पोहोचलो आहे. गेली 14 वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मानांकनानुसार गव्हर्मेंट बँकेला ग्रेड वन मानांकन असल्याचे त्याने सांगितले. सभासदासाठी बँकेमध्ये कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब, आधुनिक बँकिंग प्रणालीचा वापर करण्यात येत आहे . राज्यातील 29 उत्कृष्ट बँकेमध्ये गव्हर्मेंट बँकेचा समावेश असल्याचे अध्यक्षांनी सभासदांना सांगितले. अध्यक्षांचे तेरा मिनिटांचे भाषण झाल्यानंतर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रामराव शिंदे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू केले. मागील सभेचा कार्य वृत्तांत वाचून कायम करणे, 2023-24 या वर्षाचा वार्षिक अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकृत करणे, 2023 -24 या वर्षांमध्ये बँकेत झालेल्या निव्वळ नफ्यांची विभागणी करणे, अंदाजपत्रकापेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे व 2024-25 या वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे यासह सात विषयांचे वाचन करत सभासदांना विषय मंजूर आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी सभासदांनी मंजूर मंजूर अशा घोषणा दिल्या. सभेपुढे एकूण 12 विषय होते. मात्र पुढील पाच विषयांचे वाचन न करता सगळे विषय मंजूर असे म्हणत सभा संपवली. यावर काही सभासदांनी सगळ्या विषयांचे वाचन करा अशी मागणी केली. मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. सभासदांनी सत्ताधारी संचालक मंडळाकडे लेखी प्रश्न पाठविली होती. त्या प्रश्नांनाही उत्तरे दिली नाहीत. कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना तो विषय घाईघाईत गुंडाळला. सोळा मिनिटात सभा संपवली.
या सभेत अध्यक्ष मधुकर पाटील यांनी बँकेचा नफा दोन कोटी 47 लाख रुपये गेले सांगितले. सभेला उपाध्यक्ष अरविंद आयरे, संचालक रवींद्र पंदारे, शशिकांत तिवले, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलास कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, हेमा पाटील, मनुजा रेणके, संजय खोत, किशोर पोवार, प्रकाश पाटील, दीपक पाटील, गणपत भालकर आदी उपस्थित होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेली सभा अकरा वाजून 16 मिनिटाला संपली.