मुलींच्या १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात कोल्हापूरची समिधा चौगुले
schedule04 Sep 24 person by visibility 245 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील माजी विद्यार्थिनी व श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची खेळाडू समिधा चौगुलेची १९ वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. जळगाव येथे झालेल्या एका महिन्याच्या कॅम्पमधून तिची महाराष्ट्र संघात निवड झाली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे निवडण्यात आलेल्या अंतिम पंधरा खेळाडूमध्ये तिचा समावेश आहे. आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे.
समिधाचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या महात्मा फुले विद्यामंदिर, नेहरुनगर विद्यामंदिर व जरगनगर विद्यामंदिर येथे झाले आहे. ती सध्या, श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिकत आहे. समिधाची ही झालेली महाराष्ट्र संघातील निवड कोल्हापूर व ग्रामीण परिसरातील सर्व मुलींसाठी एक अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेच्या राजे छत्रपती संभाजी विद्यालय शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संभाजी चौगले व
महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी येथील विज्ञान विषय शिक्षिका स्वाती संभाजी चौगले यांची ती कन्या आहे. क्रीडा मार्गदर्शक श्री सरदार पाटील, वर्षाराणी पाटील, विनायक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ती सध्या खेळत आहे. तसेच दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी वेरॉक अकॅडमी पुणे येथे खेळत आहे. येथे तिला श्रीकांत कल्याणी व भूषण सर यांचे मार्गदर्शन लाभले.