कोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !!
schedule18 Sep 24 person by visibility 189 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डोळे दिपवणारा रोषणाईचा झगमगाट, संगीताच्या ठेक्यावर थिरकणारी पावलं, पारंपरिक वाद्यांच्या गजरावर कार्यकर्त्यानी धरलेला ताल, लेझीम पथकाची लयबद्ध प्रात्यक्षिके…सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक विषयावरील चित्ररथ आणि समाजप्रबोधनांवर आधारि फलकबाजी अशा वैशिष्ट्यांनी नटलेल्या आणि जल्लोषात कोल्हापुरात १७ तास गणेश विसर्जन मिरवणूक निघाली. गणरायला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर जनसागर लोटल्याचे चित्र होते. भाविकांनी, गणरायाचा जयजयकार करताना पुढील वर्षीं लवकर या अशी साद बाप्पाला घातली.
यंदा इराणी खणीत सार्वजनिक तरुण मंडळाच्या एक हजार १०१ तर घरगुती गणेश मूर्तीच्या एक हजार पस्तीस मिळून एकूण दोन हजार १३६ गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. पोलिस प्रशासनाकडून रात्री बारा वाजता साऊंड सिस्टीमचा आवाज बंद करण्यात आला. यामुळे मध्यरात्रीनंतर विसर्जन मिरवणुकीला गती मिळाली. दरम्यान मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घड नये म्हणून पोलिस यंत्रणा सज्ज होती. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा कार्यरत होती. महापालिकेतर्फे इराणी खण येथे विसर्जनची व्यवस्था केली होती. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने विसर्जन मिरवणुकीचे नेटके नियोजन केले होते.
सायंकाळ सहानंतर मिरवणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरला. शहरातील मोठया मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका मुख्य मार्गावर दाखल झाल्या होत्या. मोठया मंडळांनी यंदाही वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुका काढत वेगळेपण जपले. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते गंगावेश हा मार्ग अक्षरश गजबजला होता. नेत्रदीपक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात सारा मार्ग उजळला होता.
लेटेस्ट तरुण मंडळाचे पुष्पक विमान, लेटेस्ट रामराज्य संकल्पना, आणि हाती गुढी घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेले तरुण लक्षवेधी ठरले. मित्रप्रेम तरुण मंडळाने यंदा हत्तीची प्रतिकृती मिरवणुकीत आणली होती. पाटाकडील तालीम मंडळाचा ‘नाद खुळा, पिवळा निळा’चा जोश मिरवणुकीत रंग भरत होता. वेताळमाळ तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तालीम मंडळाच्या गीतावर फेर धरत मिरवणुकीत जल्लोष निर्माण केला. सुबराव गवळी तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळासह अन्य मोठया मंडळाच्या मिरवणुकाही आकर्षण ठरल्या. ताराबाई रोडवर हिंदवी, दयावन, रंकाळवेश, तटाकडील तालीम मंडळ, युके ग्रुपच्या मिरवणुका नागरिकांच्या आकर्षण ठरल्या.
रात्री बारा वाजता पोलिस प्रशासनाकडून साऊंड सिस्टीम बंद करण्याच्या सूचना मिळाल्या. गणेश मंडळांनी त्याला प्रतिसाद दिला. साऊंड सिस्टीम बंद झाल्यानंतर मिरवणुकीला वेग आला. पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत मिरवणूक चालली.
दरम्यान मंगळवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास शाहू खासबाग मैदान येथून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाची आरती करुन मिरवणुकीचे उद्घाटन झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजर, आकर्षक चित्ररथ, प्रबोधनात्मक फलक हे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य.सकाळी व दुपारच्या सत्रात मोजकीच मंडळे मिरवणूक मार्गावर होती. पारंपरिक वाद्यांचा गजर, प्रबोधनात्मक फलक, शहराशी निगडीत प्रश्नावरील चित्ररथ हे आकर्षण ठरले. छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाने शिस्तबद्ध मिरवणूक काढली. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी आमदार सतेज पाटील, यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंंद्र पंडित, अॅड. धनंजय पठाडे, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, आर.के. पोवार, राजू लाटकर, वसंतराव मुळीक आदींची प्रमुख उपस्थिती होती.