शिरोली-सांगली मार्गावर आणखी किती बळी हवेत ? विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा
schedule10 Sep 24 person by visibility 139 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कराच्या रूपाने कोट्यवधीचा महसूल सरकारच्या तिजोरीत जातो. तरीही शिरोली-सांगली महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. विद्यार्थ्यांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघात आणि बळी जात असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग दुरुस्त होणार अशी विचारणा करत सुरक्षित मार्गासाठी आता आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा, संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना दिला आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गाचे प्रचंड दुरावस्था झाली आहे. शिवाय मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने सातत्याने अपघात होत आहेत. अतिग्रे येथील घोडावत विद्यापीठात वीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यार्थ्यांना या महामार्गावरून प्रवास करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरूस्ती तातडीने करावी असे निवेदन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना देण्यात आले.
निवेदनावर रितेश शिंदे, सोमनाथ पाटील, शिवम वाघे, तन्वी सोनी, ओम पाटील, वेदांत जोशी, निहाल नाईक, ऋतूजा जाधव, अनिकेत पटेल, निखिल कुंभार, अभिषेक मगदूम, आशिष कोगनाळे आदींच्या सह्या आहेत.
....
बीएआयडीएफचा पाठिंबा
विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या या आंदोलनास बिझनेस अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फोरम कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूरच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे. विद्यार्थी आणि बीएआयडीएफच्या माध्यमातून आंदोलन करून याप्रश्नी जाग आणली जाणार आहे.
....