महापालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांना गिफ्ट, विमानाची सफर-इस्त्रोला भेट !!
schedule10 Feb 25 person by visibility 360 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या काही शाळांची शैक्षणिक कामगिरी ही अफलातून. खासगी संस्थांनाही लाजविणारी. सरकारी शिष्यवृत्ती परीक्षेतही यशाचा झेंडा. जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीतही विद्यार्थी झळकलेले…अशा गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेकडून अनोख बक्षीस मिळत आहे. विमानातून सफर, इस्त्रोची भेट घडवून आणली जाते. गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत झळकलेल्या २१ विद्यार्थी (१० फेब्रुवारी) विमानातून बंगळुरुकडे रवाना झाले. या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार अमल महाडिक, आमदार जयत आसगावकरही उपस्थित राहिले.
या मोहिमेसाठी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर उपायुक्त साधना पाटील यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. हे सर्व विद्यार्थी सोमवारी महापालिकेच्या मुख्य चौकातून दुपारी बारा वाजता रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना केएमटीच्या वातानुकूलित व सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार महाडीक, आमदार आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्यासोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले आहेत. विद्यार्थी विमानतळावर पोहोचल्यावर विमानतळ व्यवस्थापने केक वाटप करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. इस्त्रो भेटीदरम्यान हे विद्यार्थी सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन तसेच भारतीय बनावटीचे मॉडेल्स त्याचबरोबरच जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियममध्ये थ्रीडी शो प्लेनोटेरियमही पहावयास मिळणार आहे. या रवाना होणा-या सर्व विद्यार्थांना व शिक्षकांना क्रिडाईतर्फे सूट व बूट उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास रेल्वेने व पर्यटन बसद्वारे होणार आहे. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिक्षण समितीकडील प्रकल्पाधिकारी रसूल पाटील, जगदीश ठोंबरे, निकिता आंबुलगेकर, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, शांताराम सुतार, सचिन पांडव, नचिकेत सरनाईक, राजाराम शिंदे व पालक उपस्थित होते.