मराठी भाषेला अभिजात दर्जा, कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींना दरवर्षी पत्रे !
schedule04 Oct 24 person by visibility 177 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेली ही मागणी पूर्णत्वास आल्यामुळे मराठी जन सुखावले. विविध पातळीवर यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाचे बी.एम.रोटे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही खारीचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण गेली काही वर्षे ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी राष्ट्रपतींना हजारो पत्रे पाठवून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शब्दरुपी आवाज उमटवित होते.
बी एम रोटे ज्युनिअर महाविद्यालयातील मराठीच्या प्रा. श्वेता परुळेकर या गेली चार-पाच वर्षे मराठी भाषेला अभिजात दर्जेबद्दलचे जागरूकता व महत्त्व सातत्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवित होत्या. विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन, त्यांच्या सहकार्याून दरवर्षी मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पोस्ट कार्ड मोहीम राबवत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनीही याला चांगला प्रतिसाद देऊन मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या मागणीची दरवर्षी पाच ते सात हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपतींना पाठवित आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त भाषा पंधरवड्याच्या अनुषंगाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी समर्थन या शीर्षकाखाली विविध मान्यवरांच्या सह्यांचे संकलनही त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून केले आहे. या उपक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. अन्य प्राध्यापकांची साथ लाभली.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा गुरुवारी, तीन ऑक्टोबर रोजी केली. हा महत्वपूर्ण निर्णय साऱ्यांनाच सुखावणारा आहे. यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. श्वेता परुळेकर म्हणाल्या, ‘ खऱ्या अर्थाने याच विद्यार्थ्यांच्या खारीच्या वाट्याला यश संपादन झाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून आता थांबून चालणार नाही तर मराठी भाषा ही व्यावहारिक भाषा कशी होईल यासाठी ही विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. आमच्या पद्धतीने भविष्यात यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचेही आयोजन करू.”