डॉ. संजय डी. पाटील यांना आर्किटेक्ट असोसिएशनचे मानद सदस्यत्व प्रदान
schedule21 Sep 24 person by visibility 204 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती त्यांनी आपल्या कामातून दिली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कोल्हापूरच नव्हे तर देशभरातील इंजिनिअर्ससाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजनिअर्स कोल्हापूरच्यावतीने हॉटेल सयाजी येथील मेघ मल्हार सभागृहात आयोजित ‘इंजिनिअर्स डे’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डॉ. संजय डी. पाटील यांना असोसिएशनचं मानद सदस्यत्व प्रदान करून सन्मानित करण्यात आले. असोसिएशनच्या ५३ वर्षांच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारे डॉ. पाटील हे तिसरे सन्मानमूर्ती ठरले आहेत. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. संजय पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्राची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड असल्याने आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स यांच्याशी नेहमीच संबंधित आहे. गेल्या चाळीस वर्षात अडीच हजाराहून अधिक सिव्हील इंजिनिअर्स आणि २ हजाराहून अधिक आर्किटेक्ट आमच्या संस्थेतून पास आउट झाले आहेत. आर्किटेक्चर विभागाचा निकाल नेहमीच १०० टक्के लागत असून १६ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या कामाची माहिती दिली. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कार्जींन्नी यांनी इंजिनियर्स डे निमित्त विशेष व्याख्यानात डॉ.एम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णात जमदाडे यांनी केले. असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, अल्ट्राटेक सिमेंटचे शितलराज सिंदखेडे, अविनाश जेऊरकर, सागर छांगनी आदी उपस्थित होते.