जिल्ह्यात सतरा सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा मोहीम, अस्वच्छ ठिकाणे होणार कायमस्वरुपी स्वच्छ !!
schedule11 Sep 24 person by visibility 317 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यंदा या मोहिमेतंर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही संकल्पना निश्चित केली आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अस्वच्छ ठिकाणे निवडून ती कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन करावे. ग्रामपंचायत, नगरपालिका येथे स्वच्छता मोहिमेचा आराखडा तयार करुन, स्वच्छता मोहिमेत एनसीसी, एनएसएस स्वयंसेवी संस्थाना सहभागी करुन घ्यावे. शाळा व महाविद्यालयामध्ये स्पर्धा कचरा वर्गीकरण चर्चा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्याव्यात. सर्व विभागांनी आपल्या समन्वयातून सेवा मोहिम राबवावी.”
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले,‘ जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहिम राबविणेच्या जागा निश्चित कराव्यात. कचरा साचलेल्या जागांची निवड करावी. विशेष करुन जिल्हयात प्रवेश होणा-या गावांनी राज्य मार्ग, राष्ट्रीय मार्ग अशा ठिकाणच्या जागांची निवड करावी. स्वच्छता करणे पुर्वीचे फोटो व स्वच्छता केले नंतरचे फोटो घ्यावेत. या ठिकाणी होणारी स्वच्छता ही कायमस्वरुपी राखण्यासाठी नियोजन करावे.
बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द पिंपळे, जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन माधुरी परीट, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, महापालिका उपआयुक्त राहुल रोकडे, जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन नागेंद्र मुतकेकर आदी उपस्थित होते.