विभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता !
schedule06 Sep 24 person by visibility 335 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला "श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल" असे नाव देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देत विभागीय क्रीडा संकुल अधिकाधिक अद्ययावत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
क्रीडा संकुलातील कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा, क्रीडा संकुलात आवश्यक बाबी व सध्याच्या त्रुटींबाबतचा अहवाल समिती सदस्यांनी क्रीडा संकुलाला भेट देऊन तयार करावा. केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठीचे प्रस्ताव तयार करा, अशा सूचना करुन क्रीडा संकुलातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी खात्री पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत दिली होती. तसेच हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांच्या मागणीनुसार क्रीडा संकुलात मातीच्या आखाड्याचीही तरतूद करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या.