मिरवणुकीत लेसर लाइटसवर बंदी, पोलिस अॅक्शन मोडवर
schedule12 Sep 24 person by visibility 438 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लेसर लाइटसचा संभाव्य धोका विचारात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यावर बंदी घालण्यात आली. अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइटस वापरावर बंदी आदेश लागू केला आहे.त्या संबंधी पोलिसांना सूचना केल्या आहेत. तेव्हा गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइटसचा वापर करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे.
लेसर लाइटसमुळे डोळयावर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. गणेश आगमन मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटसचा वापर केला. या लाइटसमुळे अनेकांच्या डोळयाला इजा झाल्याच्या तक्रारी आहेत. पोलिस प्रशासनाकडे तक्रारी झाल्या. मिरवणुकीत लेसर लाइटसवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली.
लेसर लाइटसचा धोका विचारात घेऊन अप्पर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइटसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बारा ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत लेसर लाइटस वापरावर बंदी आहे. या आदेशाचे ज्या गणेश मंडळाकडून उल्लंघन होईल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.