दक्षिणमध्ये वारं फिरलं...कमळ फुललं...महाडिकांनी उधळला गुलाल !
schedule23 Nov 24 person by visibility 253 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमल महाडिक हे विजयाच्या उंबरठयावर आहेत. प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी, काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा १७ हजार ९०० मतांनी पराभव केला. आणि २०१९ मधील पराभवाचे उट्टे काढले. दक्षिणमधील ऋतुराज पाटील यांचा पराभव हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का आहे. अमल महाडिकांच्या माध्यमातून पाच वर्षांनी पुन्हा एकदा दक्षिणमध्ये कमळ फुलले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला.
कोल्हापूर दक्षिणमध्ये पारंपरिक लढत आहे. महाडिक आणि पाटील गटातील लढत म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ अशी ओळख आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ११ उमेदवार असले तरी थेट लढत अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यामध्ये झाली. प्रचाराच्या कालावधीत दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
महाडिकांनी, प्रचारात आमदार नसतानाही मतदारसंघासाठी कोटयवधी रुपयांचाा विकास निधी उपलब्ध करुन दिला. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या. प्रचार कालावधीत भाषणात त्यांनी, काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा मतदारसंघात संपर्क नाही, हे प्रकर्षाने सभेत मांडले. तर ऋतुराज पाटील यांनी गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून काम करताना मतदारसंघात ७०० कोटीहून अधिक रुपयांची विकासकामे केली आहेत. पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन केले होते.
दक्षिणसाठी ७५.७ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात २,८१,७४३ मतदारांनी मतदान केले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महाडिक यांनी ६९७ मतांची आघाडी घेतली. प्रत्येकी फेरीनिहात त्यांच्या मताधिक्क्यात वाढ झाली. पाचव्या फेरी अखेर जवळपास सहा हजारपर्यर्त मताधिक्क्य वाढले होते. हीच आघाडी त्यांनी शेवटच्या फेरीपर्यत आघाडी कायम ठेवत विजयाच गुलाल उधळला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी असा संमिश्र आहे. दोन्ही भागात महायुतीला यश मिळाले.
………………………….
“ विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी प्रचाराची पातळी सोडली होती. व्यक्तीगत आरोप केले. मात्र कोल्हापूर दक्षिणमधील सूज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली. महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना विजयी केले. महायुतीतर्फे साऱ्या मतदारांचा आभारी आहे. ”
-खासदार धनंजय महाडिक
………………………..
“ महायुतीच्या नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. माझ्या विजयासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मतदारांनी विश्वास दाखविला. पाच वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी दिली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करु. ”
-अमल महाडिक, विजयी उमेदवार कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदासंघ