ना मोठया सभा-ना बडा नेता सोबतीला ! चंदगडमध्ये अपक्ष शिवाजी पाटील विजयी !!
schedule23 Nov 24 person by visibility 53 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणूक म्हणजे पक्षीय राजकारण. पक्षाच्या ताकतीवर विजयाची गणिते ठरत असतात. दरम्यान व्यक्तीगत संपर्क, लोकांमध्ये मिसळून काम करण्याची वृत्ती असली की अपक्ष उमेदवारही मैदान जिंकू शकतो हे चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी दाखवून दिले. प्नचार काळात ना मोठया सभेचा गाजावाजा, ना बडा नेता सोबतीला. एकला चलो रेचा पॅटर्न पाटील यांनी यशस्वी करुन दाखविला.
दरम्यान नूतन आमदार पाटील हे मूळचे भाजपचे आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत. मुंबईतील भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी भाजपची यंत्रणा त्यांच्यासाठी पडद्यामागे काम करत होती ही चर्चा मतदारसंघात आहे.
या निवडणुकीत त्यांना, ८४२५४ मते मिळाली. त्यांनी, विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यावर २४ हजार १७८ मतांनी पराभव केला. राजेश पाटील यांना ६०१२० इतकी मते मिळाली. विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या व महाविकास आघाडीचे उमेदवार नंदिनी बाभूळकर (47259) यांचाही पराभव झाला.
अपक्ष उमेदवार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अप्पी पाटील यांना २४५८२ तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंग खोराटे यांना २२१०७ मते मिळाली.येथे यंदा पंचरंगी लढत आहे. ७४.९८ टक्के मतदान झाले आहे. २,४५, ६९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चंदगडमध्ये सर्वाधिक सतरा उमेदवार होते. या निवडणुकीत चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला धक्का बसला. बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांच्या पाठीशी भाजपची रसद असल्याची चर्चा वेगावली.