राधानगरीत नवा रेकॉर्ड, प्रकाश आबिटकरांची विजयाची हॅट्रट्रिक !
schedule23 Nov 24 person by visibility 33 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड मतदारसंघात तिसऱ्या टर्मला आमदार म्हणून निवडून येत नाही असे म्हटले जायचे. यंदाच्या निवडणुकीत मात्र राधानगरी-भुदरगडमध्ये नवा रेकॉर्ड तयार झाला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग तीन वेळा निवडून येत विजयाची हॅटट्रिक केली. आबिटकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्यावर ३८ हजार २५९ मताधिक्क्यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीत आबिटकर यांना एक लाख ४३ हजार ७७६ मते मिळाली. माजी आमदार केपी यांना एक लाख पाच हजार ४६२ मते मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व अपक्ष उमेदवार ए. वाय पाटील यांना १९ हजार १०५ मते मिळाली. या मतदारसंघात ७८.३० टक्के मतदान झाले आहे. २,६९,६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात सात उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान मतदारसंघावरील आबिटकर यांची पकड मतमोजणीदिनी दिसून आली. प्रत्येक फेरीत त्यांच्या मतांचा टक्का वाढला होता. या मतदारसंघाती लढत ही शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी झाली. माजी आमदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
या निवडणुकीत आबिटकर यांच्यासमोर के पी यांच्या माध्यमातून आव्हान होते. कारण महाविकास आघाडीतंर्गत के पी यांच्या पाठीशी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी ताकत एकवटली होती. दरम्यान या मतदारसंघात के पी. यांनी २००४ व २००९ च्या निवडणुकीत यश मिळवले होते. २०१४ त्या पाठोपाठ २०१९ आणि आता २०२४ मधील निवडणूक जिकंत आबिटकर यांनी हॅटट्रिक केली.