मिनी मंत्रालय ते मंत्रालय, दोन जिप सदस्य बनले आमदार ! राहुल आवाडे, अशोकराव माने विजयी !
schedule23 Nov 24 person by visibility 17 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील दोन सदस्य मैदानात उतरले होते. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल आवाडे हे विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी निवडणूक जिकंली. मिनी मंत्रालय ते मंत्रालय असा त्यांचा प्रवास घडला.
हातकणंगलेतून दलितमित्र अशोकराव माने यांना १,३३, ६२७ इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांना ८७,२९९ मते तर तिसऱ्या आघाडीचे उमेदवार व माजी आमदार सुजित मिणचेकर यांना २४,७६७ मते मिळाली. माने हे ४६,३२८ मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात या तीन उमेदवारासह अपक्ष उमेदवार म्हणून वैभव कांबळे रिंगणात आहेत. येथे मतमोजणीच्या २४ झाल्या. माने यांनी प्रारंभापासून आघाडी घेतली. हातकणंगलेसाठी यंदा ७६.४५ टक्के मतदान झाले. एकूण २,६१, २१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.येथे सोळा उमेदवार आहेत.
इचलकरंजीत महायुतीकडून राहुल आवाडे व महाविकास आघाडीकडून मदन कारंडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या मतदारसंघात ६९.६८ टक्के मतदान झाले होते. २,१७,८५३ मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या नेतेमंडळींनी सभा घेतल्या होत्या. इचलकरंजी मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण वीस फेऱ्या होणार आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. प्रत्येक फेरीनिहाय त्यांच्या मतदानात वाढ होत गेली. या मतदारसंघात या निवडणुकीत राहुल आवाडे यांना एक लाख ३१ हजार ९१९ मते मिळाली. कारंडे यांना ७५ हजार १०८ मते तर विठ्ठल चोपडे यांना २४६१ मते मिळाली. आवाडे हे ५६,८११ मताधिक्क्यांनी विजयी झाले.