महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि डिग्रजकर कुटुंबीय यांच्यातर्फे आयोजित "पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव" बुधवारपासून (11 जानेवारी) सुरू होत आहे या तीन दिवसीय महोत्सवात दिग्गज गायक-वादक आपली कला सादर करणार आहेत. अशी माहिती मंगलधामचे अध्यक्ष विवेक शुक्ल यांनी दिली. पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर यांची यंदा 101 वी जन्मतिथी आहे.
दरम्यान संगीत महोत्सव राम गणेश गडकरी सभागृह येथे रोज सायंकाळी सहा वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. बुधवारी (11 जानेवारी) उद्घाटन होईल. दि एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्नेहा राजुरीकर, पंडित सुहास व्यास यांचे शास्त्रीय गायन होईल. गुरुवारी (12 जानेवारी) डॉ सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांची संवादिनी जुगलबंदी रंगणार आहे. याच दिवशी दुसऱ्या सत्रात पंडित विनोद डिग्रजकर हे शास्त्रीय गायन करतील. शुक्रवारी (13 जानेवारी) समीहन कशाळकर आणि पद्मश्री उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होईल.
पत्रकार परिषदेला विनोद डिग्रजकर, गंधार डिग्रजकर, रामचंद्र टोपकर, श्रीकांत लिमये, अनुराधा गोसावी, संतोष कोडोलीकर, महेश कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, अशोक जोशी उपस्थित होते