महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी दहा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. चोरट्यांनी चार यामाहा, तीन हिरो होंडा स्प्लेंडर , अशा दहा मोटरसायकल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटना घडत असून या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संजय गोर्ले यांना आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कसबा बावडा कदमवाडी रोडवरील जामदार स्टॉप जवळ नंबर प्लेट नसलेली चोरीची काळ्या रंगाची यामाहा एक संशयित घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांनी जामदार स्टॉप जवळ बबलू उर्फ प्रथमेश मंडले , (वय २५ रा. मनीषा नगर ,सुभाष नगर, मुळ गाव बोडरे वस्ती विटा जिल्हा सांगली) व इसरास हनीफ सुर्वे (रा. बाळूमामा गल्ली, सुभाष नगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काळ्या रंगाच्या यामाहा संदर्भात चौकशी केली असता दोघांनी आठ दिवसांपूर्वी ताराबाई पार्क भवानी अपार्टमेंट येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार, जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, राजारामपुरी गांधीनगर ,भुदरगड ,मिरज रेल्वे स्टेशन येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून यामाहा चार, हिरो होंडा स्प्लेंडर तीन होंडा यूनिकॉर्न एक ,हिरो होंडा सीडी डीलक्स अशा मोटरसायकल जप्त केल्या. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे पोलीस अंमलदार रणजीत पाटील असिफ कवासदार, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव, सायबर शाखेचे सचिन बेंडखळे, सुरेश राठोड, अमर वासुदेव हे कर्मचारी पोलीस तपासात सहभागी झाले होते.