महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे शिक्षकांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर केव्हाही बारा व चौवीस वर्षापर्यंत घेता यावे . तसेच हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत ऑफलाईन घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक एम. डी. सिंह यांच्याकडे केली आहे. सलग सेवेची बारा वर्षे व चौवीस वर्षे पूर्ण केल्यानंतर देय असणाऱ्या वेतनश्रेणीसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण घेणे व तसे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे प्रशासनाधिकारी किरण शिरोळकर यांनी स्विकारले. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे ,सचिव राजाराम संकपाळ , जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर , सचिव नितीन पानारी शहर कार्याध्यक्ष अभिजित साळोखे , स्नेहल कुमार रेडेकर , भगवान खिलारी उपस्थित होते.