महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले ११४ रुग्ण आहेत. तर गेल्या दोन महिन्यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.
वातावरणातील बदलामुळेही रुग्ण संख्येत वाढ होत आहे. हा श्वसनामार्फत आजार पसरतो. गेल्या काही दिवसात जोरदार पाउस, कडक उन असे वातावरणातील बदल घडले. वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावरही परिणाम संभवतो. या कालावधीत सर्दी, खोकला, ताप यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडते. या कालावधीत नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
जिल्ह्याच्या विविध भागातील मिळून ४४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ५७ रुग्ण उपचाराअंती घरी पाठविले आहे. १४३ जणांची तपासणी केली असता स्वाइन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११४ इतकी आढळली होती.
दरम्यान गेल्या दोन महिन्यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका हद्दीतील चौघांचा समावेश आहे. तर करवीर तालुक्यातील तीन, हातकणंगले तालुकयातील दोघे, शाहूवाडी आणि कागल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दोन रुग्ण इतर जिल्ह्यातील होते.
“ हा आजार श्वसनामार्फ पसरतो. वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, ताप यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांना सर्दी, डोकेदुखी, ताप असेल तर त्यांनी अंगावर काढू नये. उपचार करुन घ्यावेत. तपासणी अंती लक्षणे आढळल्यास औषधोपचाराने रुग्ण बरा होउ शकतो. स्वाइन फ्ल्यूवर आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. ”
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद
…………………………..
जिल्ह्यात केवळ दोन लाख दहा हजार जणांना बूस्टर डोस
जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बूस्टर डोस उपलब्ध केला आहे. जिल्ह्यात सरकारी दवाखाने, आरोग्य केंद्रे याठिकाणी बूस्टर डोस उपलब्ध आहेत. मात्र नागरिक बूस्टर डोस घेण्याकडे पाठ करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यत दोन लाख दहा हजार नागरिकांनी बूस्टर डोस घेतली आहे.