महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी हे ३१ जानेवारी आणि एक फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसात त्यांच्या उपस्थितीमध्ये तपोवन मैदान येथे महासत्संग आणि महालक्ष्मी होम कार्यक्रम होणार आहेत. महासत्संग या कार्यक्रमासाठी दीड लाखाहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे तपोवन मैदान येथे तयारी सुरू आहे. श्री श्री रविशंकरजी हे तेरा वर्षानंतर कोल्हापुरात येत आहेत. ३१ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता शिवाजी विद्यापीठातील श्री राजमाता जिजाऊ सभागृह येथे सरपंच परिषद होणार आहे. या परिषदेला रविशंकरजी मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर तपोवन मैदान येथे सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये महासत्संग हा कार्यक्रम होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता महालक्ष्मी होम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी तपोवन मैदानासह १८ ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. याशिवाय जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे.
महासत्संग कार्यक्रमासाठी १२० बाय ८० फुटाचा स्टेज आहे. तर ३०० फुटाचा रॅम्प तयार केला आहे. कार्यक्रमस्थळी शिवमंदिराची प्रतिकृती व शिवलिंगाची मूर्ती आकर्षण ठरणार आहे.
पत्रकार परिषदेला स्वामी प्रणवानंद, देवव्रत, प्रदीप खानविलकर, अमोल येवले, दादासाहेब तावडे, डिंपल गजवानी, प्रीतम पटेल, गीतांजली चिन्ननवर, राजेंद्र लकडे, डॉ. राजश्री पाटील, संतोष लाड, अजय किल्लेदार स्वप्निल हिडदगी आदी उपस्थित होते.