ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात आढावा बैठक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देताना लम्पीस्किनच्या प्रतिबंधासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) दोन लाख डोसची खरेदी केली आहे. १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत एक लाख ४० हजार लसीचे मोफत लसीकण केले आहे अशी माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
लंम्पीस्कीनच्या उपचार व लसीकरणबाबत संचालक मंडळ, अधिकारी व पशुसंवर्धन विभागाची बैठक ताराबाई पार्क कार्यालयात झाली. चेअरमन पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. साखर हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन येणाऱ्या जनावरांची नोंद आणि लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना चेअरमन पाटील यांनी केल्या.
चेअरमन पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या साठ पशुवैद्यकीय अधिकारी ४० एलएसएस व ४०० कृत्रिम रेतन सेवक असे एकूण ५०० जणांच्या माध्यमातून गोकूळमार्फ़त मोफत लसीकरण सुरू असल्याचे सांगितले.
विश्वास पाटील म्हणाले, “१५ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होणार आहेत. जिल्ह्यातील ऊस वाहतुकीसाठी बैल व इतर जनावरे जिल्ह्यात येतील. त्या जनावरांची नोंद व लसीकरण करण्यासाठीचे नियोजन करावे. शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात व सीमा भागातील संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने लक्ष द्यावे.’
पशुसंवर्धन उपआयुक्त वाय. ए.पठाण यांनी जनावरांवर उपचार कसे करुन घ्यावेत यासंदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीत संचालक अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर,नाविद मुश्रीफ, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, शौमिका महाडिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार व संघाच्या अधिकाऱ्यांनी लम्पीच्या उपाययोजनेसंबंधी चर्चा केली.
याप्रसंगी संचालक किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, विजयसिंह मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु. व्ही.मोगले, सहायक व्यवस्थापक डॉ. पी. जे. साळुंके, सहायक व्यवस्थापक डॉ. प्रकाश दळवी उपस्थित होते.