महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
येथील कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मजा जोतीराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. न्यू कॉलेजचे माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख, प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांच्या त्या पत्नी होत.
पवार या गेली ३२ वर्षे 'राज प्रकाशन'च्या संचालिका म्हणून कार्यरत होत्या. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, क्वीझ, चित्रकला, हस्ताक्षर अशा विविध स्पर्धांचे व विविध खेळ प्रकारांचे यशस्वी आयोजन केले.
'भरारी' या महिला गौरव ग्रंथाचे, 'कविता आमच्या' या काव्य संग्रहाचे व 'शिक्षण क्षेत्रातील नवदुर्गा','राजर्षी शाहूंचे विचारधन' या पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त 'जनरल नॉलेज' च्या पाच पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.