महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने बालगोपाल तालीम मंडळावर एक गोलने विजय मिळविला. झुंझार क्लबने रंकाळा तालीम मंडळाचा ४-० असा धुव्वा उडविला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे. बुधवारी १ फेब्रुवारीपासून चौथ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होत आहे.
जुना बुधवार आणि बालगोपाल यांच्यातील सामन्यात बालगोपालचे वर्चस्व असले तरी जुना बुधवार संघाच्या खेळाडूंनी झुंजार खेळाचे दर्शन घडविले. पूर्वार्धात दोन्ही संघ आघाडीसाठी प्रयत्न करत होता. बालगोपालच्या रोहित कुरणे, व्हिक्टर, अभिनव साळोखे, ऋतुराज पाटील, प्रतिक पोवार, प्रकाश सरनाईक यांच्या धारदार चढाया जुना बुधवार पेठेच्या बचावफळीने रोखल्या. जुना बुधवारचा गोलरक्षक अब्दुला अन्सारीने चपळाईने गोलरक्षण करत संघाची खिंड लढविली. जुना बुधवारकडून रवीराज भोसले, प्रकाश संकपाळ, आकाश मोरे, सचिन मोरे यांच्या चढायाही दाद मिळवणाऱ्या ठरल्या. मध्यंत्तरास गोलफलक कोरा होता.
उत्तरार्धात गोलची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही संघ इर्ष्येने मैदानात उतरले. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला जुना बुधवार संघाला गोल करण्याची संधी मिळाली. बालगोपालच्या खेळाडूंने डी मध्ये चेंडू हाताळल्याने मुख्य पंचानी पेनल्टी बहाल केली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत जुना बुधवारच्या रिचमॉन्टने अचूक फटका मारत संघाला १-० आघाडीस नेले. बरोबरी साधण्यासाठी बालगोपालने धारदार आक्रमणे केली. त्यांच्या व्हिक्टरने गोल नोंदवण्याच्या तीन संधी वाया घालवल्या. सूरज जाधवचा वेगवान फटका गोलरक्षक अब्दुला अन्सारीने पंच केला. पंच केलेला चेंडू आडव्या पोलला लागून बाहेर गेल्याने बरोबरी साधण्याची बालगोपाची संधी वाया गेली. पूर्णवेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत जुना बुधवारने सामन्यात विजय संपादन करत तीन गुण वसूल केले.
झुंझार क्लबने रंकाळा तालीम मंडळाचा ४-० असा पराभव केला. त्यांच्या राजेश बोडकरने सातव्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते खोलले. १९ व्या मिनिटाला कार्लोस नाला तर ४० व्या मिनिटाला राजेश बोडेकरने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदविला. मध्यंत्तरास झुंझार क्लब ३-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात थॉमस गोम्सने गोल करत झुंझारच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
बुधवारचे सामने, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस्, दुपारी २ वा. शिवाजी तरुण मंडळ वि. बीजीएम स्पोर्टस्, दुपारी ४ वा.